नवी दिल्ली - तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. भारती एअरटेलने वाय-फायचा वापर करून देण्यात येणाऱ्या कॉलिंग सेवेचा विस्तार केला आहे. ही सेवा मुंबई, कोलकाता, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मिळणार आहे.
'एअरटेल वायफाय कॉलिंग'ची सेवा प्रथम फक्त नवी दिल्लीत सुरू करण्यात आली आहे. 'एअरटेल वाय-फाय कॉलिंग'मध्ये वापरकर्त्याला व्हाईस कॉलसह (उदा. व्हॉट्सअॅपद्वारे होणारे कॉलिंग) नेहमीचे कॉलिंग दुसऱ्या कोणत्याही नेटवर्कवर करता येते. त्यामुळे एअरटेल वाय-फाय कॉलिंगचा वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळणे शक्य असल्याचे एअरटेलने म्हटले आहे. त्यासाठी वापरकर्त्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच ग्राहकांचा कमी डाटा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या अॅपची गरज लागणार नाही.
हेही वाचा-इंटरकनेक्ट युझेज चार्जेस रद्द करण्याची जिओकडून पुन्हा मागणी; भारती एअरटेलचा विरोध
कोणत्याही स्मार्टफोनमधून या सेवेचा वापर करणे शक्य होणार आहे. ही सेवा विविध स्मार्टफोनमधून घेता यावी, यासाठी कंपनीकडून विविध आघाडीच्या स्मार्टफोन कंपनीबरोबर काम सुरू आहे. सध्या ही सुविधा 'एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर होम' या ब्रॉडब्रँडमधून वापरकर्त्यांना घेता येणे शक्य आहे. लवकरच ही सुविधा सर्व ब्रॉडब्रँड सेवा आणि वाय-फाय हॉटस्पॉटवर मिळू शकणार आहे.
हेही वाचा-'जिओ'ला दे धक्का... एअरटेलकडून दुसऱ्या नेटवर्कवरील आउटगोईंग पुन्हा मोफत
एअरटेल कंपनीने दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलिंगसाठी डिसेंबरमध्ये शुल्क लागू केले होते. मात्र, हे शुल्क रद्द करून पुन्हा आउटगोईंग मोफत करण्याचा दोनच दिवसात निर्णय घेतला होता.