नवी दिल्ली - देशात बेरोजगारीची समस्या उग्र झाली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमातून २.५ लाख नोकऱ्यांची निर्मिती होईल, असा विश्वास केंद्रीय कौशल्य विकास आणि आंत्रेप्रेन्युअरशीप मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी व्यक्त केला. ते वर्ल्ड स्किल्स इंडिया - इंटरनॅशनल क्लाऊट कॉम्प्युटिंग चॅलेंज २०१९ मध्ये बोलत होते.
डिजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले आहेत. यामुळे क्लाऊट कॉम्प्युटिंग मार्केट हे २०२२ पर्यंत सुमारे ४९ हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचेल, असा अंदाज महेंद्रनाथ पांडे यांनी व्यक्त केला. सध्या ही बाजारपेठ १७,२५० कोटींची आहे.
आयटी क्षेत्रातील आगामी प्रगत बदलाला भारत हा सक्षमतेने सामोरे जाईल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व तरुण हे अत्याधुनिक आणि ज्ञानाच्या साहाय्याने करतील, असेही ते म्हणाले. डाटा संरक्षण विधेयक संसदेमध्ये मंजूर करावे, अशी अपेक्षा असल्याचे नॅसकॉमचे चेअरमन केशव मुरुगेश यांनी यावेळी म्हटले. पुढे ते म्हणाले, येत्या तीन ते चार वर्षात २० लाख लोकांना डिजीटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नॅसकॉमच्या साहाय्याने क्लाऊट कॉम्प्युटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जपान, चीन, ब्राझील, दक्षिण कोरिया, रशिया, सिंगापूर, बेल्जियम आणि आर्यलंड या देशांनी सहभाग घेतला.