सॅनफ्रान्सिस्को - व्हिडिओ मीटिंग झुमने जगभरातील वापरकर्त्यांना 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' मोफत देण्याचे जाहीर केले आहे. ही सुविधा मीटिंगमध्ये सहभागी होणाऱ्या २०० जणापर्यंत मिळू शकणार आहे.
मोफत एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनची सुविधा हा तत्काळ उपलब्ध होणार असल्याचे झुम कंपनीने म्हटले आहे. त्यासाठी वापरकर्त्यांकडून ३० दिवसापर्यंत फीडबॅक अपेक्षित असल्याचे झुमचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी जेसन ली यांनी सांगितले.
काय आहे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन?
एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनमध्ये वापरकर्त्याची माहिती गोपनीय राहते. वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कुणालाही मीटिंगमध्ये सहभागी होता येत नाही. झुमचे अकाउंट असणाऱ्या अॅडमिनला एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन हे डेस्कटॉपवरून सुरू करता येणार आहे. यापूर्वी झुमकडून केवळ पैसे भरून सेवा घेणाऱ्या ग्राहकांना एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनची सुविधा देण्यात येत होती.
दरम्यान, टाळेबंदीत झुमच्या वापरकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सुरक्षेतील त्रुटीमुळे झुम कंपनी यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात पडली होती.