नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज सुमारे १३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर भारती एअरटेलचे शेअर हे ६ टक्क्यांहून अधिक वधारले. सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना थकित एजीआर शुल्क भरण्यासाठी १० वर्षांची मुदत दिली आहे. त्यानंतर दूरसंचार कंपन्यांचे शेअरमध्ये चढ-उतार झाले आहेत.
व्होडाफोन आयडियाचे शेअरमध्ये १२.७६ टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर बाजार बंद होताना व्होडाफोन आयडियाच्या शेअरची किंमत ८.८९ टक्के होती. सुरुवातीला व्होडाफोन आयडियाचे शेअर वधारले होते. भारती एअरटेलचे शेअर हे ६.३८ टक्क्यांनी वधारूनन प्रति शेअर हे ५४६.७५ रुपये झाले आहे. भारती एअरटेल ही शेअर वधारणाऱ्या कंपन्यांमध्ये शेअर बाजारामध्ये आघाडीवर होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे ०.४३ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर २ हजार ८७.५५ पैसे झाले होते.
कोटक सिक्युरिटीजच्या मुलभूत संशोधकाचे प्रमुख रसमिक ओझा म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा व्होडाफोन आयडियाला भारती एअरटेलसारखा फायदा होणार नाही. व्होडाफोनने थकित एजीआर शुल्क भरण्यासाठी २० वर्षांची मुदत मागितली होती. मात्र, हा कालावधी १० वर्षांचा करण्यात आला आहे.
असा आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना थकित एजीआर शुल्क भरण्यासाठी १० वर्षांची मुदतवाढ दिली आहे. दूरसंचार कंपन्यांना थकित एजीआरपैकी १० टक्के शुल्क हे ३१ मार्च २०२१ अखेर भरण्याची सर्वोच्च न्यायालयाने सूचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना १० वर्षात टप्प्याट्प्प्यात थकित एजीआर शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. जर हे शुल्क भरण्यात दूरसंचार कंपन्या अयशस्वी ठरल्या तर त्यांना दंड, व्याजासह न्यायालय अवमान प्रकरणाला सामोरे जावे लागेल, असा सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला आहे.