वॉशिंग्टन – टिकटॉक वापरकर्त्यांच्या माहितीवर नियंत्रण ठेवत असल्याने भारतापाठोपाठ अमेरिकेमध्येही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या उद्दिष्टासाठी टिकटॉकसारख्या चिनी अॅपचा वापर होत आहे. त्यामुळे अमेरिकन लोकांची सुरक्षितता आणि गोपनीयतेसाठी चिनी अॅपबाबत निर्णायक कृती करावी, अशी मागणी 25 लोकप्रतिनिधीकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या संसदेमधील 25 लोकप्रतिनिधींनी 15 जुलैला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून चिनी अॅपबाबत लक्ष वेधले आहे. या पत्रात लोकप्रतिनिधींनी म्हटले, की देशाच्या सुरक्षिततेबाबत चिंता असल्याने भारताने चिनशी संबंधित अॅपवर बंदी घालून अभूतपूर्व पाऊल उचलले आहे. चीनचा कम्युनिस्ट पक्ष पद्धतशीर मोहिम आखण्यासाठी माहिती गोळा करत आहे. तसेच चिनी अॅप वापरकर्त्यांचा डाटा चीन सरकारच्या हेतूसाठी त्यांच्याकडे पाठवित आहे. हे केवळ भारतीय वापरकर्त्यांच्याबाबत घडत नाही.
अमेरिकेने चीनचे टिकटॉक अॅपसह इतर कोणत्याही चिनी समाज माध्यमावर व अॅपवर विश्वास ठेवू नये. ते अमेरिकन नागरिकांचा डाटा, गोपनीयता आणि सुरक्षा याचे नियम पाळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मोहिमेला थांबविण्यासाठी कडक कारवाई करण्याची लोकप्रतिनिधींनी ट्रम्प प्रशासनाला विनंती केली आहे. चिनी अॅपवर बंदी घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला पाठिंबा देत असल्याचे लोकप्रतिनिधींनी म्हटले.
दरम्यान, भारताने नुकतेच 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. त्यामध्ये भारतात लोकप्रिय ठरलेल्या टिकटॉक आणि हॅलो अॅपचा समावेश आहे. भारताचा सार्वभौमपणा व सुरक्षिततेला धोका असल्याने या अॅपवर बंदी घातल्याचे सरकारने आदेशात म्हटले होते.