नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची आज लोक कल्याण मार्ग येथे बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 24 जूनला झाली होती. त्या बैठकीत पशुवसंवर्धन पायभूत विकास निधीसाठी 15,000 कोटी मंजूर केले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सध्या, कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण आणि त्याचा अर्थव्यवस्थेला बसलेला फटका हे देशासमोर प्रमुख प्रश्न आहेत.
यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी वर्गातील समस्यांवर स्थापन केलेल्या समितीला 6 महिन्यांची 31 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश येथे कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्री विमानतळ सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय आण्विक उर्जा, अवकाश विभागाचे राज्यमंत्री जिंतेंद्र सिंह म्हणाले, की इंडियन नॅशनल स्पेस ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहे. हे संस्था अवकाश क्षेत्रात प्रोत्साहन आणि परवानगी देण्याचे काम करणार आहे. तसेच खासगी कंपन्यांना अंतराळातील मोहिमांसह इतर कामांसाठी मार्गदर्शन करणार आहे. त्याकरता प्रोत्साहनात्मक धोरण आणि स्नेहपूर्ण नियमनाच्या वातावरणात इंडियन नॅशनल स्पेस काम करेल, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते.