न्यूयार्क- ट्विटर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाची ठिणगी अजूनही शमत नसल्याचे दिसून आले आहे. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लाईड यांना श्रद्धांजली वाहणारा ट्रम्प यांचा व्हिडिओ ट्विटरने ब्लॉक केला आहे.
कृष्णवर्णीयांचे आंदोलन पेटले असतानाच ट्रम्प यांनी जॉर्ज फ्लाईड यांना श्रद्धांजली वाहणारा व्हिडिओ शेअर केला. पण हा कॉपीराइट सुरक्षितता या मुद्द्यावरून ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ ब्लॉक केला आहे. ट्रम्प यांच्या व्हिडिओवर ट्विटरने कॉपीराइटचा प्रश्न असल्याचेही नमूद केले आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर'वर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. तरीही नियमावर बोट दाखवून ट्रम्प यांचा व्हिडीओ ब्लॉक करण्यात आला आहे.
कॉपीराइटच्या धोरणानुसार आम्ही कॉपीराईटवरून करण्यात आलेल्या तक्रारीला प्रतिसाद देत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
हे आहे ट्रम्प यांच्या व्हिडिओमध्ये
ट्रम्प यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा तीन मिनिट 45 सेकंदाची क्लिप आहे. यामध्ये शांततेने आंदोलन करणारे नागरिक आणि त्यांची गळाभेट घेणारे पोलीस असे दृश्य आहे. तर पियानो ट्रम्प यांचे भाषण आहे
नुकतेच ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटला फॅक्ट चेक असे लेबल दाखवले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी कार्यकारी आदेश काढून व्हाइट हाऊसला समाज माध्यमावर कारवाई करण्याचे जादा अधिकार दिले आहेत.
दरम्यान, जॉर्ज फ्लाइड या व्यक्तीचा वांशिक भेदभावामधून मृत्यू झाल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघाले आहे.