वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणावर चहुबाजूंनी टीका होत असताना त्यांनी मात्र त्याचे समर्थन केले आहे. त्यांनी ग्रीन कार्डचे अर्ज डिसेंबरपर्यंतर रद्द करणे, अमेरिकन लोकांना नोकऱ्या देण्यासाठी आवश्यक असल्याच म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आदेश काढण्याचे खास अधिकार असतात. या कार्यकारी अधिकाराचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांनी 90 दिवसापर्यंत ग्रीन कार्ड थांबविण्याचे आदेश काढले आहे. त्यानंतर त्यांनी घोषणा करून हे आदेश 31 डिसेंबरपर्यंत वाढविले आहेत.
ट्रम्प म्हणाले, की आम्हाला अमेरिकन लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहे. हा त्यांचा अधिकार आहे. ते सॅन लुएझमध्ये माध्यमांशी बोलत होते.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची 3 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात लाखो अमेरिकन नागरिकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. त्यामुळे व्हिसाबाबतचे पाऊल हे महत्त्वाचे असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेत ग्रीन कार्डची प्रक्रिया बंद केली तर, अमेरिकेत कायमस्वरुपी कायदेशीर रहिवासी म्हणून प्रयत्न करणाऱ्या भारतीय लोकांना दहा वर्षांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अमेरिका दरवर्षी तिथे नोकरी करणाऱ्या स्थलांतरितांना व त्यांच्या कुटुंबांना 1 लाख 40 हजार ग्रीन कार्ड देते.