नवी दिल्ली - मोबाईल क्रमांक लवकरच ११ अंकी होण्याची शक्यता आहे. दूरसंचार नियामक संस्था ट्रायने १० अंकी क्रमांक ११ अंकी करण्यावर लोकांकडून मत मागविले आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात दूरसंचार कनेक्शनची मागणी वाढत असल्याने ट्रायला ११ अंकी क्रमांक करण्याची गरज वाटू लागली आहे. सरकारने यापूर्वीच इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि मशिनसाठी १३ अंकी क्रमांक सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून सर्वात लोकसंख्येचा देश होणार आहे. तर २०५० मध्ये भारत १.६४ अब्ज लोकसंख्येचा देश होणार आहे.
हेही वाचा-कांद्याच्या दराने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी; गेल्या ४ वर्षातील भाववाढीचा उच्चांक
देशामध्ये १.२ अब्ज टेलिफोन कनेक्शन आहेत. ट्रायच्या आकडेवारीनुसार २०५० पर्यंत २.६ अब्ज आणखी क्रमांक लागणार आहे. देशातील मोबाईल टेलिफोनची संख्या २०५० मध्ये ३.२८ अब्ज होईल, असा अंदाज ट्रायने अहवालात व्यक्त केला आहे. जास्तीत जास्त क्रमांक मिळविण्याचे स्त्रोत असण्यासाठी ट्रायने १० वरून ११ क्रमांक करण्यासाठी लोकांकडून मत मागविले आहे. सध्या देशात ९,८ आणि ७ क्रमांकाने सुरू होणारे २.१ अब्ज कनेक्शन आहेत.
हेही वाचा-कॉर्पोरेट करात कपातीने सरकारची वित्तीय जोखीम वाढणार - मूडीज
मोबाईल क्रमांक बदलणे, क्रमांक ब्लॉक होणे, नवा क्रमांक देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेत वेळ लागणे अशा कारणांनी यंत्रणेत अकार्यक्षमता निर्माण होत असल्याचे ट्रायने म्हटले आहे. लोकांना मोबाईल १० वरून ११ अंकी करण्याबाबत १ ऑक्टोबरपर्यंत मत देता येणार आहे. तर ४ नोव्हेंबरला आणखी प्रतिक्रिया (काउंटर कॉमेंट्स) देता येणार आहेत.