श्रीनगर - केंद्र सरकारने फुटीरतावाद्यांना चाप लावण्यासाठी जमात-ए-इस्लामीवर बंदी घातली. या निर्णयाला विरोध करत जम्मू व काश्मीरमध्ये आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. दुकाने व वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामीशी संबंध असलेल्या २०० व्यक्तींना अटक केली आहे. जम्मू व काश्मीरला देण्यात आलेला ३५ ए आणि ३७० हा विशेष दर्जा कायम राहावा, या मागणीसाठीही बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला जॉइंट रिजिस्टन्स लिडरशिप (जेआरएल) या फुटीरतावादी संघटनेचे अध्यक्ष सय्यद अली गिलानी, मिरवाईझ उमेर फारुख, मोहम्मद यासिन मलिक यांनी पाठिंबा दिला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने श्रीनगरमधील जुन्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त ठेवला आहे. केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामीवर बेकायदेशीर संघटना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये बंदी घातली आहे. या संघटनेचे काम हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला व देशाच्या एकतेला बाधा आणणारे असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.