नवी दिल्ली - जम्मू व काश्मीरचे कलम ३७० हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या भूमिकेला चिनने समर्थन दिले. यामुळे अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तसेच चीनी वस्तुंवर ५०० टक्के आयात शुल्क लागू करावे, अशी सीएआयटीने मागणी केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चीनने पाकिस्तानला समर्थन देत कलम ३७० रद्द करण्यावर प्रश्न उपस्थित केला. या निर्णयानंतर चीन हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानला समर्थन दिल्याने चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकून त्याची किंमत चुकवू द्यावी, असे सीएआयटी म्हटले आहे. हा विषय संघटनेच्या २९ ऑगस्टमधील राष्ट्रीय परिषदेत उपस्थित करण्यात येणार असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.
भारताविरोधात असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची चीनला सवय आहे. अशा परिस्थितीमध्ये चीनी मालावरील अवलंबित्व कमी करण्याची योग्य वेळ आल्याचे संघटनेने म्हटले आहे. चीनी मालावर ३०० ते ५०० आयात शुल्क लागू करावे, अशी संघटनेने मागणी केली.