नवी दिल्ली - एनडीए सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पारशोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी यांनीही केंद्रीय राज्य कृषीमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.
नरेंद्र सिंह तोमर यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, निवडणुकीत दिलेलेल्या आश्वासनाप्रमाणे मोदी सरकारने पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना मंजूर केली आहे. त्यासाठी २ हेक्टरची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना पेन्शन योजना-
स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेतून सुमारे ५ कोटी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना पहिल्या तीन वर्षात लाभ मिळणार आहे.
पशुंना होणाऱ्या रोगांना अटकाव करण्यासाठी लसीकरण योजनेतून निधी मंजूर केला आहे. देशाची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन योजनेतून आर्थिक मदत मिळणार आहे. कृषी क्षेत्राचा विकास व शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे तोमर यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली.