वॉशिंग्टन – अमेरिकन कंपनीला विक्री होणाऱ्या टिकटॉकच्या सौद्याबाबत संपूर्ण सुरक्षितता आणि अमेरिकेचा मोठा फायदा व्हावा, अशी अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. त्यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंत देशात व्यवसाय करण्याची अंतिम मुदत असल्याचेही अधोरेखित केले.
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी आणण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर टिकटॉकने अमेरिकेतील व्यवसाय विकण्यासाठी मायक्रोसॉफ्टबरोबर बोलणी करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, की मायक्रोसॉफ्टसह इतर कंपन्या टिकटॉक खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे मला माहित आहे. मात्र, आम्ही अंतिम मुदत दिलेली आहे. आमच्याकडील कोणतीही माहिती चीनमध्ये जावू नये, अशी आमची इच्छा आहे.
टिकटॉककडून अमेरिकेतील वापरकर्त्यांची माहिती चीन सरकारला पाठविण्यात येत असल्याचा ट्रम्प यांनी अनेकदा आरोप केला आहे. कंपनीने टिकटॉकचे सर्व्हर अमेरिकेत तर बॅक अप हाँगकाँगमध्ये असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका प्रश्नाबाबत चीनशी नाही तर कंपनीबरोबर बोलत आहे.
दरम्यान, अमेरिकेतील नेबारस्का राज्यानेही टिकटॉकवर बंदी लागू केली आहे. भारताने सर्वात प्रथम टिकटॉकसह इतर 59 चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे.