नवी दिल्ली - इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करणाऱ्या टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आणि गुगलमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. गुगलची मालकी असलेल्या वायमोच्या प्रमुखांनी टेस्ला स्वयंचलित वाहनाच्या दर्जाबाबत टीका केली होती. त्यावर मस्क यांनी वायमोपेक्षा टेस्लाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अधिक चांगले असल्याचे म्हटले आहे.
वाहनांची पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा सुरू होण्यासाठी टेस्लाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अधिक चांगले असल्याचे ट्विट इलॉन मस्क यांनी केले आहे.
हेही वाचा-व्हॉट्सअप हे भारतीय वापरकर्त्यांबाबत पक्षपाती; केंद्राचा उच्च न्यायालयात दावा
काय म्हणाले होते वायमोचे प्रमुख?
वायमोचे सीईओ जॉन क्रॅफकिक यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत टेस्लाच्या दर्जावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, पूर्णपणे स्वयंचलित आणि सेल्फ ड्रायव्हिंग यंत्रणेबाबत टेस्लाचा चुकीचा दृष्टीकोन आहे. वायमोचे सेन्सर हे अधिक चांगले आणि अचूक असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा-महामारीतही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्क्यांनी वाढ
काय आहे वायमो आणि टेस्लाच्या वाहनांमध्ये फरक?
वायमोच्या वाहनांमध्ये एलआयडीएआरसह विविध सेन्सर बसविण्यात आली आहेत. त्यामुळे विना चालक हे वाहने चालविणे शक्य आहे. एवढेच नव्हे तर प्रवाशांनी अशा वाहनात स्टिअरिंगला हात लावू नये, अशी विनंती वायमो कंपनीने केली आहे. प्रत्यक्षात टेस्लाचे सेल्फ ड्रायव्हिंग बिटामध्ये अजूनही चालकाची गरज भासते. टेस्लाकडूनही पूर्णपणे सेल्फ ड्रायव्हिंग वाहनाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, टेस्लाने चालू वर्षात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने बंगळुरुमध्ये कार्यालयाची नोंदणीही केली आहे.