मुंबई - राज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. त्यांना सर्व सुविधा व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आवाहन केले. ते इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीवर वेबिनारमध्ये बोलत होते.
राज्य सरकारच्यावतीने विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी आयोजित केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया फोरममध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की इलेक्ट्रॉनिक वस्तू क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. परंतु गॅझेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. घरी राहून काम करणाऱ्यांनादेखील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मोठी मदत झालेली आहे. पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राची मोठी वाढ होणार आहे.
हेही वाचा-शेअर बाजार ५९५ अंशांनी वधारून बंद; 'या' कारणाने वधारले शेअर
राज्य सरकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आहे. त्याद्वारे काही सवलती दिल्या जात आहेत. गुंतवणुकदारांना योग्य प्रोत्साहने दिली जात आहेत. याशिवाय डेटा सेंटर्स, विकास आणि संशोधन केंद्र, सुसज्ज इंटनेट जाळे आदीमुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राला अधिक पसंती देतात, असे उद्योगमंत्र्यांनी वेबिनारमध्ये म्हटले आहे. राज्यात मुबलक प्रमाणात व दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्याची निवड करावी, असे आवाहन देसाई यांनी केले.
हेही वाचा-स्टेट बँकेचा धक्का; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात
राज्यात ५१ हजार उद्योग सुरू-
इंडिया मर्चंट चेंबर्सच्या वेबिनारमध्ये उद्योगमंत्री देसाई यांनी राज्यातील उद्योगाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात सध्या ५१ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर १३ लाख कामगार या ठिकाणी रुजु झाले आहेत. छोट्या व मध्यम उद्योगांसाठी राज्य सरकार विवध योजना जाहीर करणार आहे. मजुरांसाठी कामगार ब्यूरोची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या चर्चासत्रात उत्तर प्रदेश, गुजरात व तेलंगाना राज्यांतील उद्योजकांनी सहभाग घेतला.
हेही वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकरणात मार्क झुकेरबर्गची ट्विटरवर टीका
दरम्यान, कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीने राज्यातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. या उद्योगांना चालना देण्यासाठी व गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.