नवी दिल्ली - केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सचिव सुभाष चंद्रा गर्ग यांची बुधवारी अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांनी आज उर्जा मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्विकारला आहे. गर्ग यांनी गुरुवारी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णयही जाहीर केला आहे.
सुभाष चंद्रा गर्ग हे केंद्रीय वित्त मंत्रालयातील सर्वात अधिक वरिष्ठ अधिकारी आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज भरल्याचे गुरुवारी जाहीर केले.
ट्विटमध्ये गर्ग यांनी काय म्हटले आहे ?
केंद्रीय अर्थव्यवहार मंत्रालयाची जबाबदारी (चार्ज) सोपविली आहे. वित्त मंत्रालय आणि अर्थव्यवहार विभागामध्ये खूप काही शिकायला मिळाले. उद्या उर्जा मंत्रालयाची जबाबदारी घेणार आहे. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेसाठी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
गर्ग यांची अचानक उर्जा सचिव म्हणून बदलली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अर्थव्यवहाराचे सचिव म्हणून त्यांच्याकडे वित्तीय धोरण, आरबीआयशी संबंधित कामकाज इत्यादी जबाबदारी होती. केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यातही गर्ग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
असा आहे गर्ग यांचा प्रशासकीय प्रवास-
सुभाष चंद्रा गर्ग हे राजस्थान केडरमधील भारतीय प्रशासकीय सेवेचे १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर २०१४ मध्ये केंद्रात जबाबदारी देण्यात आली. जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची २०१७ पर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१७ मध्ये त्यांची केंद्रीय अर्थव्यहार सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. हसमुख अढिया यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्यावर वित्त मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी डिसेंबर २०१८ मध्ये देण्यात आली आहे.