नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरबीआय संचालक मंडळाची आज बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारकडून प्राधान्य देण्यात येणाऱ्या विषयांची माहिती आरबीआयच्या संचालकांना दिली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नेहमीप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सेबी व आरबीआयच्या संचालक मंडळाची बैठक घेतली आहे. आरबीआयच्या ५८७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच सरकारकडून प्राधान्य देण्यात येणाऱ्या विषयांची माहिती दिली. संचालक मंडळाच्या बैठकीत सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच जागतिक व आर्थिक आव्हाने आणि आरबीआयकडून करण्यात येणाऱ्या विविध कामकाजांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामध्ये बँकांबाबत करण्यात येणाऱ्या तक्रार यंत्रणेत सुधारणा करण्याचा समावेश आहे.
हेही वाचा-आत्मनिर्भर भारत: अॅमेझॉन देशात पहिल्यांदाच डिव्हाईसचे करणार उत्पादन
बैठकीला हे अधिकारी होते उपस्थित-
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. याशिवाय सरकारने संचालक मंडळावर नियुक्त केलेले वित्तीय सेवा सचिव देवाशीष पांडा आणि अर्थव्यवहार सचिव तरुण बजाज होते. केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर, वित्तीय सचिव अजय भूषण पांडे आणि गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन सचिव तुहीन कांता पांडे हेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा-देशाच्या जीडीपीत डिसेंबरच्या तिमाहीत होणार १ टक्के घसरण
दरम्यान, कोरोना महामारीत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १ फेब्रुवारीला ३४.५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.