नवी दिल्ली - लसींच्या उत्पादनातील बलाढ्य कंपनी सिरम इन्स्टि्यूटने २०२१ मध्ये बाजारात कोरोनाची लस उपलब्ध होईल, असा दावा केला आहे. कोरोना महामारी असल्याने या लसीचे पेटंट घेण्यात येणार नाही, असा निर्णयही पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदार पुनावाला यांनी जाहीर केला.
कोरोनाची लस विकसित झाल्यानंतर भागीदारी कंपन्यांबरोबर लसीचे उत्पादन घेण्यात येईल, असे आदार पुनावाला यांनी सांगितले. ते बेनेट विद्यापीठाच्या ऑनलाईन परिषदेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, की कोरोनाच्या लसीपासून पैसे मिळविण्याची आमची इच्छा नाही. लोकांच्या सार्वजनिक आरोग्यापलीकडे व्यापार आहे. आमची कंपनी प्रायव्हेड लिमिटेड असल्याने आम्ही करू शकतो. कंपनीच्या शेअर धारकांना आम्ही बांधील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या लसीचे सध्या उंदरावर प्रयोग सुरू आहेत. महिनाभरात मानवावर त्याची चाचणी सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.