नवी दिल्ली – नागरी विमान वाहतुकीची नियामक असलेल्या डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे 31 जुलैपर्यंत स्थगित केली आहेत. याबाबतचे परिपत्रक डीजीसीएने काढले आहे. या परिपत्रकात काही नवीन विमान मार्गांचा नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सेवेत समावेश केला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा स्थगित केली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) 26 मार्चला परिपत्रक काढून आंतरराष्ट्रीय विमान सेवा 15 जुलै 2020 पर्यंत स्थिगित करण्यात आल्याचे जाहीर केले. हे स्थगिती डीजीसीएने 31 जुलैपर्यंत वाढविल्याचे परिपत्रक काढले आहे.
असे असले तरी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा ही काही मार्गांसाठी सुरू राहणार असल्याचे डीजीसीएने परिपत्रकात म्हटले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंद केली असली तर वंदे भारत मिशनमधून विदेशातील नागरिकांना मायदेशी परत आणण्यात येत आहे. या मिशनमध्ये एअर इंडियासह देशातील खासगी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान देशांतर्गत दोन महिने बंद असलेली विमान वाहतूक सेवा 25 मेपासून सुरू करण्यात आली आहे.