नवी दिल्ली - न्यायालय अवमान प्रकरणात फेरविचार करण्याच्या विजय मल्ल्याच्या याचिकेवर दोन्ही पक्षांनी आपल्या बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आल्या आहेत. या याचिकेवरील आदेश सर्वोच्च न्यायालयाने राखीव ठेवला आहे. न्यायालयाने आदेश देवूनही मल्ल्याने २०१७ मध्ये मुलांच्या खात्यावर ४० दशलक्ष डॉलर पाठविले होते.
विजय मल्ल्याच्या फेरविचार याचिकेचा यादीत का समावेश केला नाही, याची विचारणा करत त्याबाबतची सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीकडून जूनमध्ये मागविली होती. गेली तीन वर्षे फेरविचार याचिकेची फाईल कोणत्या अधिकाऱ्यांनी हाताळली याची माहिती देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालायने रजिस्ट्रीला दिले आहेत.
काय आहे न्यायालयाच्या अवमानाचे प्रकरण-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला ९ मे २०१७ रोजी दोषी ठरविले होते. दरम्यान, मल्ल्याने बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. मल्ल्या हा इंग्लंडमध्ये पळून गेला आहे. कर्ज थकविलेल्या बँकांच्या समुहाचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मल्ल्याकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर मल्ल्याने मुलगा सिद्धार्थ, मुलगी लीना व तन्या मल्ल्या यांच्या खात्यावर पैसे पाठविल्याचे समोर आले होते.