नवी दिल्ली – देशाची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या नफ्यात पहिल्या तिमाहीत 81 टक्के वाढ झाली आहे. स्टेट बँकेने पहिल्या तिमाहीत 4 हजार 189.34 कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. बुडीत कर्जाच्या प्रमाणात घसरण झाल्याने स्टेट बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे.
स्टेट बँकेला मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जूनच्या तिमाहीत निव्वळ 2 हजार 312.02 कोटी रुपयांचा नफा झाला होता. स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 74 हजार 457.86 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे, तर मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेने 70 हजार 653.23 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. ही माहिती स्टेट बँकेने शेअर बाजाराला दिली आहे.
स्टेट बँकेचे गेल्या वर्षी जूनअखेर बुडीत कर्जाचे प्रमाण 7.53 टक्के होते, तर चालू वर्षात जुनअखेर बुडीत कर्जाचे प्रमाण हे 5.44 टक्के झाले आहे.