मुंबई - मंदीतून जाणाऱ्या वाहन उद्योगाला दिलासा देणारा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सणाच्या मुहूर्तावर वाहन कर्जाचे प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले आहे. बँकेने वाहन खरेदीवर सर्वात कमी ८.७० टक्के व्याजदराची ऑफर दिली आहे. त्यावर वाढीव कोणतेही व्याजदर असणार नाही.
जे ग्राहक योनो डिजीटल अॅप अथवा बँकेची वेबसाईट वापरतील त्यांना २५ बेसिस पाँईटची कर्जाच्या व्याजदरात सवलत दिली जाणार आहे. एसबीआय बँकेकडून २० लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज १०.७५ टक्के व्याजदराने उपलब्ध करून देणार आहे. हे कर्ज ६ वर्षापर्यंत फेडण्याची मुदत असणार आहे. पगार खाते असलेल्या ग्राहकांना बँकेच्या वेबसाईटवरील चार क्लिकवरच ५ लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.
देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी ५० लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते. तर विदेशात शिक्षण घेण्यासाठी १.५० कोटीपर्यंतचे कर्ज दिले जाते. दोन्ही प्रकारच्या कर्जावर व्याजदर हा ८.२५ टक्क्यापासून पुढे आहे. ईएमआयचा ताण होवू नये म्हणून ग्राहकांना १५ वर्षापर्यंत कर्जमुदत घेता येते.
नुकतेच एसबीआयने एमसीएलआर हा १५ बेसिस पाँईटने कमी केला होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या गृहकर्जावरील व्याजदर हा एप्रिल २०१९ पासून ३५ बेसिस पाँईटने कमी झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देण्यात येणाऱ्या गृहकर्जाचा व्याजदर हा सर्वात कमी म्हणजे ८.०५ टक्के आहे. हा व्याजदर रेपो दराशी संलग्न असलेल्या गृहकर्जाचा आहे. एसबीआयने १ सप्टेंबरपासून घेण्यात आलेल्या गृहकर्जाचे व्याजदर हे ८.०५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.