नवी दिल्ली - स्टेट बँकेच्या ग्राहकांकरिता महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने बचत खात्यांमधून (बीएसबीडी) पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार महिन्यात चारहून अधिक वेळा एटीममधून ग्राहकाने पैसे काढले तर ग्राहकाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
स्टेट बँकेच्या ग्राहकांना एका वर्षात एकच दहा पानी चेकबुक देण्यात येणार आहे. अतिरिक्त चेकबुकसाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा-माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, जबाब नोंदवण्यासाठी दिला 'व्हीसी'चा पर्याय
असे आहेत नवीन नियम-
- नवीन नियमानुसार महिन्यात चारहून अधिक वेळा एटीममधून पैसे काढावे लागले तर ग्राहकांना १५ रुपये ते ७५ रुपये अतिरिक्त मूल्यवर्धित सेवेसाठी आकारले जाणार आहेत.
- बिगर वित्तीय व्यवहार आणि एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पैसे पाठविण्याची सुविधा ही बँकांच्या शाखांवर मोफत राहणार आहे. तसेच ही सेवा एटीएम आणि सीडीएमवरही मोफत राहणार आहे.
- बँकांच्या शाखांमधून पैसे काढणाताना १५ रुपयांसह जीएसटी शुल्क आकारण्यात येणार आहे.
- ग्राहकांना दुसरे १० पानी चेकबुक घेण्याकरिता ४० रुपयांसह जीएसटी शुल्क, २५ पानी चेकबुकसह ७५ रुपये आकारले जाणार आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकसाठी अतिरिक्त पैसे आकारण्यात येणार नाहीत.
- बँकांमध्ये बचत खाते केवळ केवायसीची पूर्तता केल्यानंतर उघडता येणार आहे. अशी खाती ही आर्थिक दुर्बल घटकांना बचत करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाते.
- हे नियम १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहेत.
हेही वाचा-३१ जुलैपर्यंत 'वन नेशन, वन राशन कार्ड' लागू करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश
स्टेट बँकेने दंड ठोठावून पाच वर्षात जमा केले ३०० कोटी रुपये
- चालू वर्षात एप्रिलमध्ये आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार स्टेट बँकेने १२ कोटी बचत खातेदारांना दंड ठोठावून २०१५ ते २०२० काळात ३०० कोटी रुपये जमा केले आहेत. प्रत्येक बचतधारकांकडून चार व्यवहारांनंतर १७.७० शुल्क आकारणे हे सयुक्तिक नसल्यातेही आयआयटी मुंबईच्या अहवालात म्हटले आहे.
- स्टेट बँकेनेतर पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. पीएनबीने २०१५ ते २०२० दरम्यान ३.९ कोटी बचत खातेदारांना दंड ठोठावून ९.९ कोटी रुपये जमा केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना बचत खातेदारांना दंड ठोठावता येतो.