नवी दिल्ली - वाहन उद्योग मंदीमधून जात असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने वाहन वितरकांना (ऑटो डिलर) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वाहन वितरकांना देण्यात आलेल्या कर्जाच्या मुदतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने वाढ केली आहे. ही माहिती एसबीआयचे व्यस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजीटल बँकिंग) पी.के.गुप्ता यांनी माध्यमांना दिली.
सामान्यत: व्यावसायिकांना पतमर्यादा (क्रेडिट लिमीट) ही ६० दिवसांची असते. यामध्ये वाढ करून मुदत ७५ दिवस करण्यात आली आहे. तर काही प्रकरणामध्ये मुदत ही ९० दिवसांची करण्यात आल्याचे पी.के.गुप्ता यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, किरकोळ ग्राहकांना कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. उत्पादकांकडून विकत घेताना वाहन वितरकांना कर्ज दिले जाते. बँकांकडून घेण्यात येणाऱ्या वाहन कर्जाचे प्रमाण कमी झाल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
विक्री घटल्याने सुमारे ३०० डीलरशीपचे व्यवसाय बंद, २ लाख जणांनी गमाविल्या नोकऱ्या-
वाहन उत्पादन प्रकल्पामधील सुमारे १५ हजार हंगामी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. विक्री घटल्याने सुमारे ३०० डीलरशीपचे व्यवसाय बंद झाल्याचे वाहन उद्योगाची संघटना एसआयएएमने म्हटले आहे. डीलरशीप व्यवसाय बंद झाल्याने सुमारे २ लाख कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. चालू वर्षात वाहन विक्रीत १८.७१ टक्के घट झाली आहे. त्याचा फटका बसल्याने गेल्या १९ वर्षातील विक्रीचा निचांक वाहन उद्योग क्षेत्र अनुभवत आहे.