मुंबई - डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाने गेल्या नऊ महिन्यातील निचांक गाठला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत ९७ पैशांनी घसरून ७२.३९ वर पोहोचला. देशातील गुंतवणूकदार संस्थांनी शेअरची केलेली विक्री व आर्थिक चिंताजनक स्थिती, याचा हा परिणाम आहे.
गेल्या सहा वर्षात प्रथमच चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्के एवढा कमी झाला आहे. यानंतर देशाच्या चलनावरील दबाव वाढल्याने रुपयाची घसरण सुरू झाली आहे.
हेही वाचा-५ टक्के.... तुम्हाला माहीत नाही का, ५ टक्के म्हणजे काय - पी. चिदंबरम
जुलैमध्ये महत्त्वाच्या ८ औद्योगिक क्षेत्रात २.१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. विशेषत: कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाचे कमी उत्पादन झाल्याने ही घसरण झाली आहे. इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजार खुला होताना रुपया ७२ वर पोहोचला होता. त्यानंतर घसरण होऊन रुपया डॉलरच्या तुलनेत ७२.४० वर पोहोचला. दिवसाअखेर रुपया ९७ पैशांनी घसरून ७२.३९ वर पोहोचला. यापूर्वी एकाच दिवसात एवढी मोठी घसरण ५ ऑगस्टला झाली होती. तर बाजार बंद होताना १३ नोव्हेंबर २०१८ ला एवढ्या कमी मुल्यावर होता.
हेही वाचा-स्थावर मालमत्ता क्षेत्राला लवकरच मिळणार आर्थिक सुधारणांचा 'टेकू'
फॉरेक्स ट्रेडर्सच्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात डॉलरने किमतीत उच्चांक गाठला आहे. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धाने अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या चलनाची मागणी वाढली आहे. तसेच ब्रेक्झिटच्या कारणानेही रुपयाचे मूल्य घसरत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-आयडीबीआयला मिळणार ९ हजार कोटींचे भांडवली अर्थसहाय्य; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी