नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजने कोरोनाच्या संकटातही चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. कंपनीने एप्रिल-जूनच्या तिमाहीत 13 हजार 248 कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते जुनदरम्यान रिलायन्सने 10 हजार 141 कोटींचा नफा मिळविला होता.
कंपनीला हिस्सा विकून 4 हजार 966 कोटींचा लाभ झाल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. कंपनीचे भांडवली मूल्य हे एकूण 12 लाख कोटी रुपये झाले आहे. देशात पहिल्यांदाच भारतीय कंपनीने एवढे भांडवली मूल्य मिळविले आहे.
रिलायन्समध्ये जगभरातील विविध कंपन्यांकडून गुंतवणूक होत असल्याने कंपनीला एकूण 1.18 लाख कोटी रुपये मिळणार आहेत. त्यासाठी रिलायन्सने जिओमधील 25.24 टक्के हिस्सा विकला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मूल्य असलेली कंपनी आहे. गेल्याच महिन्यात रिलायन्सचे भांडवली मूल्य हे 11 लाख कोटी रुपये झाले होते. अद्याप, देशातील कोणत्याही कंपनीला भांडवली मूल्य हे 11 लाख कोटी रुपये मिळविणे शक्य झाले नाही.
चालू आर्थिक वर्ष हे रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी सौद्याचे ठरले आहे. काही सौद्यातून कंपनीकडे कोट्यवधी रुपये हस्तांरित झाले आहेत. तर मोठ्या प्रमाणात निधी कंपनीला मिळण्याच्या मार्गावर आहे. रिलायन्सला मिळणारा अतिरिक्त निधी हा सध्याच्या प्रतिकूल काळात व्यवसाय वृद्धीसाठी राखीव म्हणून ठेवण्यात येण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.