नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यात ४२ जवानांना वीरमरण आल्यानंतर देशभरात सामाजिक संस्था त्यांच्या परिवाराला मदत करण्यासाठी सरसावल्या आहेत. रिलायन्स फाउंडेशनने देखील हुतात्मा वीर जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कुटुंबांना व मुलांना रोजगार देण्याची संपूर्ण जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शविली आहे.
पुलवामा हल्ल्यातील जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी आमची रुग्णालये सज्ज असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सैन्यदलाच्या सेवेसाठी सरकारने कोणतीही जबाबदारी दिली तरी ती पेलू असेही रिलायन्स फाउंडेशनने म्हटले आहे. रिलायन्स फाउंडेशन ही रिलायन्स इंडस्ट्रीजची सामाजिक संस्था आहे.