मुंबई - बँकिंग व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या आरटीजीएसच्या वेळेची मर्यादा भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढविली आहे. बँक ग्राहकांना आरटीजीएस पूर्वी दुपारी चार वाजेपर्यंत करण्याची मुदत होती. आरबीआयच्या आदेशानुसार १ जूनपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बँक ग्राहकांना आरटीजीएस करण्याची परवानगी असणार आहे.
आरटीजीएस ही आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणारी व्यवस्था आहे. यामध्ये ग्राहकांना एका बँकेच्या खात्यावरून दुसऱ्या बँकेच्या खात्यावर रिअल टाईम पैसे पाठविता येतात. त्यासाठी बँकांच्या कार्यालयीन दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंतची वेळ आरबीआयने निश्चित केलेली होती. नव्या आदेशानुसार साडेसहा वाजेपर्यंत आरटीजीएसची सेवा सुरू राहणार आहे. आरटीजीएसच्या वेळेप्रमाणे दर वेगवेगळे असणार आहेत. ग्राहकांकडून दुपारी १ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रति आर्थिक व्यवहारावर ५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.