नवी दिल्ली - आयआरसीटीसीची पहिली खासगी रेल्वे असलेल्या तेजस एक्सप्रेसने पहिल्याच महिन्यात दमदार कामगिरी केली आहे. सुत्राच्या माहितीनुसार, तेजसने ऑक्टोबरमध्ये सुमारे ७० लाख रुपयांचा नफा कमविला आहे. यामध्ये ३.७० कोटी रुपये हे तिकीट विक्रीतून मिळविले आहेत.
भारतीय खाद्यपान आणि पर्यटन महामंडळाकडून (आयआरसीटीसी) लखनौ-दिल्लीदरम्यान तेजस एक्सप्रेसची रेल्वे सेवा सुरू आहे. या रेल्वेमधील आसने ही ५ ऑक्टोबरपासून साधारणत: ८० ते ८५ टक्के भरलेली असल्याचे सूत्राने सांगितले.
संबंधित बातमी वाचा-पहिल्यांदाच आयआरसीटीमार्फत चालणाऱ्या तेजस एक्सप्रेसची दोन दिवसात बुकिंग फुल
असा आहे आयआरसीटीसीचा तेजसवरील खर्च-
तेजस ही ५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २१ दिवस धावली आहे. (रेल्वेची सेवा आठवड्यात सहा दिवस सुरू आहे.) या कालावधीत आयआरसीटीसीचा रेल्वेवर एकूण ३ कोटी रुपये खर्च झाला आहे. भारतीय रेल्वेची कंपनी असलेल्या आयआरसीटीसीचे तेजसच्या सेवेवर दररोज सुमारे १४ लाख रुपये खर्च झाले आहेत. तर तिकीट विक्रीतून आयआरसीटीसीला दररोज १७.५० लाख रुपये मिळाले आहेत.
संबंधित बातमी वाचा-'या' ट्रेनला उशीर झाल्यास मिळणार पैसे परत
रेल्वेकडून पहिल्यांदाच खासगी पद्धतीने तेजस ही रेल्वे लखनौ-दिल्ली मार्गावर सुरू करण्यात आलेली आहे. आयआरसीटीसीकडून प्रवाशांना जेवण, २५ लाख रुपयापर्यंतचा विमा व उशीर झाल्यास मोबदला अशा सुविधा देण्यात येत आहेत.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. यामध्ये सचिवांच्या गटाचाही समावेश आहे. या टास्क फोर्सकडून खासगी रेल्वे सेवा आणि रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अपेक्षित आहे. अद्याप, टास्क फोर्सची पहिली बैठकही पार पडलेली नाही.