नवी दिल्ली - रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवर देण्यात येणाऱ्या मोफत वायफाय सुविधेचा विस्तार केला आहे. त्यानुसार देशभरातील २ हजार रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा देण्यात येत आहेत.
राजस्थानमधील अजमेर विभागामधील राणा प्रताप नगर स्टेशन हे २ हजारावे मोफत इंटरनेट सेवा असणारे रेल्वे स्टेशन ठरले आहे. ही माहिती रेलटेलचे सीएमडी पुनित चावला यांनी दिली. ते म्हणाले, आमचे पथक वायफाय सुविधा वाढविण्यासाठी काम करत आहे. शुक्रवारी आम्ही ७४ रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा सुरू केली आहे. रेलटेल ही रेल्वेची कंपनी आहे. डिजीटल सर्वसमावेशकता वाढविण्यासाठी रेलटेलकडून रेल्वेस्टेशनमध्ये मोफत वायफायची सेवा देण्यात येते.
पहिल्या टप्प्यात देशभरात १ हजार ६०० स्टेशनवर वायफाय सुरू करण्यात आली आहेत. रेलटेल टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उर्वरित स्टेशनवर वायफाय देण्यासाठी काम करत आहे.
ग्रामीण भागात आणि विरळ लोकसंख्या असलेल्या भागातील रेल्वे स्टेशनमध्ये इंटरनेट सेवा देण्यावर रेलटेल प्राधान्य देत आहे.