नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना देशातील वाढत्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने रोजगारासाठी काय केले आहे, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 1 नोकरी आणि 1 हजार लोक बेरोजगार झाले आहेत, अशी त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की 1 नोकरी, 1 हजार बेरोजगार, देशासाठी काय करण्यात आले आहे. कर्जफेडीचा वाढीव कालावधी संपल्यानंतर देशातील सूक्ष्म, लघू, मध्य उद्योग मोठ्या प्रमाणात बंद पडणार असल्याचा इशारा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार असलेल्या गांधींनी 20 ऑगस्टला दिला होता. इतिहासात पहिल्यांदच तरुणांना रोजगार देण्याची देशाकडे क्षमता नसेल, असे त्यांनी म्हटले होते.
बेरोगारीच्या संकटाचा दिला होता इशारा-
देशातील असंघटित क्षेत्राकडून 90 टक्के रोजगार देण्यात येतो, असे राहुल गांधी यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हटले होते. कर्जफेडीचा वाढीव कालावधी संपल्यानंतर असंघटित क्षेत्रातील अनेक व्यवसाय बंद पडणार आहेत. त्यामुळे देशात बेरोजगारीचे संकट निर्माण होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाची व्यवस्था उद्धवस्त केल्याचा त्यांनी आरोप केला होता. कर्जफेडीचा वाढीव कालावधी संपल्यानंतर देशातील कंपन्या एकामागून एक बंद पडणार असल्याचे तुम्ही लवकरच पाहणार आहात, असेही गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.