नवी दिल्ली - कांद्याचे दर प्रति किलो ६० रुपयापर्यंत पोहोचले असताना ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खासगी व्यापाऱ्यांनी देशात आयात केलेला १ हजार टन कांदा महिनाअखेर पोहोचणार आहे.
देशात आयात करण्यात येणाऱ्या कांद्याची व्यापाऱ्यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला माहिती दिली आहे. पुढील महिन्यातही १ हजार टन कांदा व्यापारी मागविणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने नियम शिथील केल्याने आयात केलेला कांदा देशात लवकर पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-सरकारी बँकेतील ठेवींवरील विमा संरक्षण काढा; बँक कर्मचारी संघटनेची मागणी
कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी व देशात पुरेसा कांदा साठा व्हावा, याकरिता सरकारने खासगी तसेच सरकारी व्यापारी संस्थांना आयातीची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने एमएमटीसी या सरकारी संस्थेद्वारा १ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ आणि पुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांद्याच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी, व्यापाऱ्यांना मर्यादित साठ्याचे बंधन आणि अतिरिक्त कांद्याचा साठा बाजारात उपलब्ध करून देणे असे उपाय केले आहेत.
संबंधित बातमी वाचा-'केंद्र सरकार किमती नियंत्रणात ठेवण्याकरता १ लाख टन कांदा आयात करणार'