नवी दिल्ली - नीरव मोदीसह मेहूल चोक्सीने फसवणूक केल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड कंपनीने ३ हजार ८०० कोटींची फसवणूक केल्याचे पीएनबीने म्हटले आहे. तसा अहवालही बँकेने आरबीआयला दिला आहे.
फॉरेन्सीक ऑडीट व सीबीआयने भूषण कंपनीचा तपास केला. यामध्ये कंपनी तसेच संचालकांनी बेकायदेशीर पैसे बँकिंग व्यवस्थेमधून वळविल्याचे दिसून आल्याचे पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे. ही माहिती पीएनबीने शेअर बाजाराला दिली आहे.
नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीने १४ हजार कोटींची फसवणूक केल्यानंतर पंजाब नॅशनल बँक आर्थिक डबघाईमधून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्यांदा फसवणूक उघडकीस आल्याने पंजाब नॅशनल बँकेसमोर आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.