नवी दिल्ली - नीरव मोदीने हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर अजूनही पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुकीचे इतर प्रकरणे समोर येत आहेत. पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १ हजार २०३ कोटी २६ लाखांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक सिंटेक्स इंडस्ट्रीजने केल्याची माहिती बँकेने शेअर बाजाराला दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले, की सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) कंपनीने कर्ज बुडवून १ हजार २०३.२६ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक अहमदाबादमधील कार्पोरेट शाखेच्या पीएनबी बँकेत झाली आहे. बँकेने आरबीआयला फसवणुकीची माहिती दिली आहे. त्यानंतर नियमाप्रमाणे २१५.२१ कोटींची तरतूद केल्याचेही पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे.
दरम्यान, कर्ज बुडविल्यानंतर बँकांकडून थेट संबंधित कर्जदाराकडून फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात येते. यापूर्वी हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची तब्बल १३ हजार कोटींची फसवणूक केली आहे.