मुंबई- देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 15 हजार 423 कोटी 39 लाख 67 हजार 392 रुपयांचा चुना लावून भारतातून पळून गेलेल्या निरव मोदी व मेहूल चोक्सी यांच्यावर कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणा सध्या काम करत आहेत. मात्र, 15 हजार कोटी रुपयांहून चुना लावण्यात आलेल्या पीएनबी बँकेला अद्यापही एक छदामसुद्धा दोघांकडून मिळाला नाही. ही माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ता जितेंद्र घाडगे यांनी पंजाब नॅशनल बँकेकडे मेहुल चोक्सी व नीरव मोदी यांना देण्यात आलेल्या कर्जाविषयी विचारणा केली होती. या संदर्भात उत्तर देताना पंजाब नॅशनल बँक कडून स्पष्ट करण्यात आलेला आहे की , नीरव मोदी याला पंजाब नॅशनल बँक कडून तब्बल 7, 409 कोटी 7 लाख 25 हजार 776 रुपयांचे कर्ज देण्यात आले होे. याबरोबरच मेहूल चोक्सी याला तब्बल 8014 कोटी 32 लाख 41 हजार 616 रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. मात्र , पंजाब नॅशनल बँकेला या दोघांकडून एक रुपया सुद्धा पुन्हा मिळालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीच्या ताब्याची पीएनबीला प्रतिक्षा-
नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या संपत्तीतील बऱ्याच गोष्टी तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या आहेत. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा ताबा हा पंजाब नॅशनल बँकेला मिळालेला नसल्याचाही माहिती अधिकाराखाली स्पष्ट करण्यात आलेला आहे. ईडीने जप्त केलेल्या काही महागड्या पेंटींग्स, बंगले व गाड्यांच्या संदर्भात नीरव मोदी याच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दावा केला आहे. याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने पीएनबी बँकेला या संपत्तीचा ताबा न मिळाल्याने त्याचा लिलाव करता आलेला नाही.
फेब्रुवारी 2018 मध्ये झाला घोटाळा उघड -
पंजाब नॅशनल बँकेला 15 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदी व मेहूल चोक्सी च्या संदर्भात फेब्रुवारी 2018 मध्ये आर्थिक घोटाळा समोर आला. अडीच वर्ष होऊन गेली तरी पंजाब नॅशनल बँकेला एक रुपयासुद्धा दोघांकडून वसूल करता आलेला नाही. नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्याविरोधात बँकेकडून खटला दाखल करण्यात आलेला आहे. या खटल्याच्या संदर्भात आतापर्यंत किती पैसे खर्च करण्यात आले आहेत, अशा प्रकारची माहिती विचारण्यात आल्यानंतर पीएनबी बँकेकडून यासंदर्भात कुठलेही उत्तर देण्यात आले नसल्याचे आरटीआय कार्यकर्ता जितेंद्र घाडगे यांनी सांगितले आहे. नीरव मोदी व मेहुल चोक्सीच्या विरोधात खटला लढवला जात आहे. या संदर्भात कायदेशीर न्यायालयीन लढाईही पंजाब नॅशनल बँकेतर्फे मेसर्स शार्दुल अमरचंद मंगलदास आणि कंपनी ही लॉ फर्म पाहत आहे.
नीरव मोदी इंग्लंडच्या तुरुंगात-नीरव मोदीला भारता फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात इंटरपोलने नोटीस काढली आहे. इंग्लंडमध्ये त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या, तेथील स्थानिक तुरुंगात नीरव मोदी आहे. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणाच्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे.