नवी दिल्ली – पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. गेल्या २४ दिवसात २२ दिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी इंधनाच्या किरकोळ विक्रीचे दर आज जैसे थे ठेवले आहे.
दिल्ली पेट्रोलचा दर प्रति लिटर 80.43 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 80.53 रुपये आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लिटर ५ पैशांनी आणि डिझेलचे दर 14 पैशांनी वाढविले होते. हेच आजही इंधन विक्रीसाठी लागू आहेत. सरकारी तेल मार्केटिंग कंपनीमधील सूत्राच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात ग्राहकांना पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीपासून दिलासा होणार आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर कमी झाले असताना कंपन्यांकडून इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
सरकारी कंपन्यांनी 14 मार्च ते 6 जूनपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. या कालावधीत सरकारकडून उत्पादन शुल्क वाढविण्यात आले होते. मात्र, कंपन्यांनी ग्राहकांना दरवाढीची झळ बसू दिली नव्हती. टाळेबंदी खुली होत असतानाच 7 जूनपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.17 रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 11.14 रुपये वाढले आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाचा दर प्रति बॅरल हा 40 डॉलर राहिला आहे. यापेक्षा कमी दर झाले तर त्याचा ग्राहकांना थेट फायदा मिळणार आहे.
जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर कमी होवूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने सोमवारी देशभरात आंदोलने करण्यात आली आहेत. तर वाहतुकदारांच्या संघटनेनेही दरवाढीवरून सरकारचा निषेध केला आहे.