नवी दिल्ली – समाज माध्यम कंपनी फेसबुक ही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञानावरील संसदेच्या स्थायी समितीने फेसबुक कंपनीला 2 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे समन्स बजाविले आहे. फेसबुककडून गैरवापर होत असलेल्या दाव्यांबाबत स्थायी समिती फेसबुक कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणार आहे.
फेसबुककडून भाजपच्या नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर कारवाई होत नसल्याचा अमेरिकेच्या एका कंपनीने आरोप केला होता. त्याची दखल संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष शशी थरुर यांनी घेतली आहे. ही समिती 2 सप्टेंबरला फेसबुकच्या अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रतिनिधींनाही प्रश्न विचारणार आहे. समाज माध्यमांसह ऑनलाईन न्यूज मीडियाकडून होणारा गैरवापर थांबविणे आणि नागरिकांचे हितसंरक्षण करणे हा माहिती तंत्रज्ञान समितीचा चौकशीदरम्यानचा मुख्य हेतू असणार आहे.
दरम्यान, माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदावरून शशी थरुर यांना काढून टाकावे, अशी भाजपचे नेते निशीकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे नुकतेच मागणी केली आहे. काँग्रेसकडून राजकीय मोहीमेसाठी संसदीय समितीचा वापर होत असल्याचा दुबे यांनी आरोप केला आहे.
संसदीय समितीने नोटीस बजाविल्यानंतर फेसबुकने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.