इस्लामाबाद –पाकिस्तानची आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रतिमा आणखी बिघडली आहे. कोरोनाच्या टाळेबंदीचे नियम शिथील होत असतानाही पाकिस्तानी नागरिकांना विविध युरोपियन देशांमध्ये प्रवेश बंदी आहे. त्यानंतर आता पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान सेवेलाही (पीआयए) युरोपियन देशांमध्ये प्रवेश करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
पाकिस्तानच्या विमानांना युरोपियन देशांमध्ये बंधन लागू केल्यानंतर पाकिस्तानचे पत्रकार नजम सेठी यांनी ट्विट केले. ते म्हणाले, की 'अविश्वसनीय! प्रथम, पाकिस्तानी नागरिकांना विविध देशांमध्ये परवानगी नव्हती. त्यानंतर आखाती देशांतील विमान कंपन्यांनी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला. आता, पाकिस्तानच्या विमानांवर युरोपियन देशाने निर्बंध लागू केले आहे. धन्यवाद! निवड करणारे आणि पाकिस्तानच्या संघाचे कर्णधार!'
युरोपियनने टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर देशांच्या विमान कंपन्यांना वाहतुकीची परवानगी दिली आहे. मात्र, या यादीमध्ये पाकिस्तानचे नाव नाही. युरोपियन विमान वाहतूक सुरक्षा संस्थेने (ईएएसए) पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील वैमानिक पात्र आहेत की नाहीत, याबाबत साशंकता असल्याचे म्हटले आहे. विमान वाहतूक सेवेमध्ये पाकिस्तानने विश्वास गमाविल्याचे ईएएसएने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सरकारने पडताळणी केली असताना 860 पैकी 262 वैमानिकांकडे बनावट वैमानिक परवाना आणि परीक्षेची खोटी कागदपत्रे आढळली आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातात 98 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात वैमानिकाची चूक होती, असा अंदाज आहे.