नवी दिल्ली - देशातील अभियंत्याच्या बेरोजगारीचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तंत्रज्ञानाचे कौशल्य नसणे हे अभियंत्यांच्या बेरोजगारीचे प्रमुख कारण असल्याचे 'एस्पायरिंग माइंड्स'च्या अहवालात म्हटले आहे.
देशातील ३.८४ टक्के अभियंत्यांना तांत्रिक, भाषिक आणि विश्लेषणात्मक ज्ञान नसल्याचे एस्पायरिंग माइंड्सच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
काय म्हटले आहे अहवालात-
केवळ ३ टक्के अभियंत्यांना कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, मोबाईल डेव्हलपमेंटचे ज्ञान आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे सरासरी १.७ टक्के रोजगार निर्मिती झाली आहे. केवळ ३६ टक्के अभियंते हे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रकल्प पूर्ण करतात.
अभियांत्रिकेचे ज्ञान हे पुस्तकीस्वरुपात अधिक आहे. तर ६० टक्के प्राध्यापकांना अभियांत्रिकीतील संकल्पानाचा उद्योगात काय वापर होतो, हे माहीत नाही. यामध्ये बदल करण्याची गरज एस्पायरिंग माईंडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि सहसंस्थापक वरुण अग्रवाल यांनी व्यक्त केली. हा अहवाल तयार करण्यासाठी अमेरिका, चीनसह भारतामधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर संशोधन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या तुलनेत चारपट कोडिंगची (संगणकीय आज्ञावली) माहिती असते. असे असले तरी कोडिंगमध्ये भारतीय अभियंत्यांची क्षमता चीनच्या अभियंत्याहून अधिक असल्याचे आढळून आले आहे. ही क्षमता चीनच्या तिप्पट असल्याचे अहवालात म्हटले आहे.