कोईम्बतूर - देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडिगो ६ ई ३८१ या विमानाने चेन्नई ते कोईम्बतूर असा प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कोईम्बतूर विमानतळावर इंडिगो विमान सोमवारी रात्री ८ वाजता विमानतळावर उतरले. यावेळी विमानामधून उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि स्क्रीनिंग करण्यात आली. या तपासणीमधून एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णाला तातडीने ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचीही लवकरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा-उबेर इंडियाकडून ६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने २५ मेपासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू केली. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन महिने देशांतर्गत विमान वाहतूक बंद होती. देशात ५३२ विमानांची उड्डाणे झाली आहेत. यामधून ३९ हजार २३१ प्रवाशांना इच्छित शहरामध्ये पोहोचविण्यात आले आहे. मात्र, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालने विमान वाहतूक सेवेला परवानगी दिलेली नाही.
हेही वाचा-टीव्हीएस मोटरकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्क्यांची कपात