नवी दिल्ली - फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून मजकूर काढण्यात आला तर त्याविरोधात स्वतंत्र असलेल्या ओव्हरसाईट बोर्डकडे वापरकर्त्याला अपील दाखल करता येणार आहे. हे स्वतंत्र बोर्ड भारतात शुक्रवारी स्थापन करण्यात आले आहे.
द्वेषमूलक पोस्टवरून फेसबुकवर भारतासह जगभरात टीका केली जात आहे. वापरकर्त्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट ठेवणे आणि काढण्यासाठीही स्वतंत्र बोर्डाकडे अपील करता येणार आहे. या बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर फेसबुकला ९० दिवसानंतर निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे. इन्स्टाग्राम हे फेसबुकच्या मालकीचे आहे. फेसबुकवरून मजकूर न काढण्यासाठी केलेले अपील कंपनीने फेटाळले तर स्वतंत्र बोर्डाकडे अपील करता येणार आहे. मजकूर काढण्याबाबत ओव्हरसाईटचा निर्णय हा फेसबुकला बंधनकारक असणार आहे.
ओव्हरसाईट बोर्डासाठी फेसबुककडून १३० दशलक्ष डॉलरची तरतूद
फेसबुकने या बोर्डासाठी १३० दशलक्ष डॉलरची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे फेसबुकदेखील काही कठीण आणि महत्त्वाची प्रकरणे ओव्हरसाईट बोर्डाकडे सोपवू शकणार आहे. मुक्त अभिव्यक्ती आणि मानवाधिकाराच्या दृष्टीने फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांसाठी हे लक्षणीय महत्त्वाचे पाऊल असल्याचे ओव्हरसाईट बोर्डचे सहअध्यक्ष जेमल ग्रीन यांनी माध्यमांना सांगितले.
हे आहेत ओव्हरसाईट बोर्डमध्ये सदस्य
फेसबुकने २०१८ मध्ये स्वतंत्र ओव्हरसाईट बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या बोर्डाकडून मजूकर दुरुस्ती आणि पारदर्शक पद्धतीने काम होईल, असे फेसबुकने म्हटले आहे. ओव्हरसाईट बोर्डने चालू वर्षात मे महिन्यात २० सदस्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये माजी न्यायाधीश, पत्रकार, मानवाधिकार चळवळीती कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या बोर्डामध्ये फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार नाही.