नवी दिल्ली - ज्या रेशन कार्डधारकांना दुकानातून जाऊन धान्य खरेदी करणे शक्य नाही, त्यांना दिल्लीमधील स्वस्त धान्य दुकानात जाण्याची गरज लागणार नाही. कारण, रेशन कार्डधारकांनी निर्देशित केलेल्या नागरिकांकडे दिल्ली सरकारने त्यांचे धान्य सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश दिल्ली सरकारने 26 ऑगस्टला काढले आहेत.
राज्य व केंद्र सरकारकडून अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून मोफतपणे धान्य पुरविठा करण्यात येतो. त्यामधील काही पात्र रेशनकार्डधारक त्यांना मिळणाऱ्या धान्यासाठी निर्देशित व्यक्तीची नोंदणी करू शकतात.
हेही वाचा-राजस्थान - बिकानेरमधील श्री बालाजी गावाजवळ अपघात, 11 जण ठार
दिल्ली सरकारने ई-पीओएस सिस्टिम राबविण्यास सुरूवात केली आहे. या योजनेनुसार लाभार्थ्यांना अंगठ्याच्या ठशावरून ओळख पटवून धान्य दिले जाते. मात्र, घराबाहेर पडणे अशक्य असते, अशा कुटुंबांना धान्य मिळविणे कठीण जात आहे. त्यांना दिलासा देण्याकरिता दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांचा शपथविधी सोहळा संपन्न, इतिहासात प्रथमच...
हे कुटुंब असणार निर्देश व्यक्तीचे नाव देण्यासाठी पात्र-
- ज्या कुटुंबात चार किंवा त्याहून कमी सदस्य असतील, त्यांन धान्य आणण्यासाठी निर्देशित व्यक्तीचे नाव देता येणार आहे.
- अशा सर्व कुटुंबातील व्यक्तींचे वय हे 65 वर्षांहून अधिक किंवा 16 वर्षांहून कमी असावे, अशी अट घालण्यात आली आहे.
- अथवा सर्व कुटुंब सदस्य हे कुष्ठरोग, दिव्यांग, आजारपणाने अंथरुणाला खिळलेले असतील तरच कुटुंबाला निर्देशित व्यक्तीकडून रेशन धान्य मिळणार आहे. विशेष प्रकरणात सर्कल अन्न सुरक्षा अधिकारी हे आधार कार्डाची ओळख पटवून रेशन धान्याचा पुरवठा करेल, असेही दिल्ली सरकारने आदेशात म्हटले आहे.
- निर्देशित व्यक्ती हा रेशन कार्डधारक आणि त्याच दुकानातील ग्राहक असावा, अशी अट घालण्यात आली आहे.
- निर्देशित व्यक्तीची माहिती देण्यासाठी लाभार्थ्याला फॉर्म भरावा लागणार आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये 17.77 लाख रेशन कार्डधारक आहेत. तर 72 लाख लाभधारक आहेत. दिल्ली सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना अशा योजनांमधून नागरिकांना मोफत धान्य दिले जाते.
हेही वाचा-तेलंगाणामधील शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती