नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्राप्तिकरदात्यांना नोटीस मिळाली तरी त्यांना स्थानिक प्राप्तिकर अधिकाऱ्यांची भेट घेण्याची गरज नाही. त्यासाठी प्रत्यक्ष संपर्कात न येता वापरणाऱ्या यंत्रणचेचा वापर करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
इंटरनेटच्या यंत्रणेचा वापर केल्याने (फेसलेस यंत्रणा) विभागाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
काय म्हटले आहे प्राप्तिकर विभागाने?
प्राप्तिकर विभागाने म्हटले, की कागदपत्रांची पडताळणी करण्याकरता नोटीस आली तर त्याची चिंता करू नये. फेसलेस प्राप्तिकर विभाग मदतीसाठी आहे. तुम्हाला उत्पन्न आणि कराबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना भेटण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेतून प्राप्तिकर विभागाला उत्तरे द्यायची आहेत. ही उत्तरे फेसलेस प्राप्तिकर विभाच्या टीमकडून पाहिली जाणार आहेत. या टीम देशातील विविध शहरांमध्ये कार्यरत आहेत. फेसलेस प्राप्तिकर विभागाकडून योग्य आदेश देण्याची खात्री देण्यात येणार आहे. या टीमकडून 58 हजार करदात्यांना मदत करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने फेसलेस पडताळणी योजनेतून 7 हजार 116 प्रकरणे पहिल्या टप्प्यात निकाली काढले आहेत. तर आणखी 291 प्रकरणांवर काम सुरू आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेसलेस प्राप्तिकर पडताळणी व्यवस्थेची 5 जुलैला अर्थसकंल्प सादर करताना घोषणा केली होती. त्यामागे प्राप्तिकरदात्यांची सोय व्हावी, हा हेतू होता. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे.