चेन्नई – आयात वाढण्यात काही चुकीचे नाही. मात्र, गणेश मुर्तीचीही चीनमधून आयात करण्यात येते, यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आश्चर्य व्यक्त केले. कच्चा माल देशात उपलब्ध नसताना मागविणे ही उद्योगांची गरज आहे. त्यामध्ये चुकीचे नाही, असे सीतारामन यांनी म्हटले. त्या भाजपच्या तामिळनाडूमधील कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संबोधित असताना बोलत होत्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत अभियान मोहिमेबाबत मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, की देशात उत्पादन वाढेल, अशी आयात करणे चुकीचे नाही. त्यामधून नक्कीच रोजगारनिर्मिती वाढू शकणार आहे. मात्र, ज्या आयातीने रोजगारनिर्मितीच्या संधी वाढत नाही, त्या आयातीने भारतीय अर्थव्यवस्थेला मदत होत नाही. तसेच आत्मनिर्भर भारताला मदत होत नाही. पारंपारिक पद्धतीने स्थानिक कुंभार हे दरवर्षी गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त गणेश मुर्ती तयार करतात. मात्र सध्या, गणेश मुर्तींची चीनमधून का आयात करण्यात येते? अशी का परिस्थिती आहे? आपण गणेश मुर्ती तयार करू शकत नाही का? ही परिस्थिती आहे का?
दैनंदिन जीवनात साबणाचे खोकडे, अगरबत्ती, प्लास्टिकच्या वस्तूही आयात करण्यात येतात. या वस्तुंचे स्थानिक एमएसएमई उद्योगांकडून उत्पादन होवू शकत होते. ज्या वस्तुंचे स्थानिक उत्पादन होवू शकते, त्यांची आयात करणे थांबविण्याची स्थिती बदलणे हे आत्मनिर्भर अभियानामागील उद्दिष्ट आहे. स्वालंबन(आत्मनिर्भर) हे देशात अनेक वर्षापासून सुरू होते. मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. नवे अभियान हे स्थानिक उत्पादनांच्या पाठिशी राहणारे आहे. आत्मनिर्भर भारत अभियान म्हणजे आयात थांबविणे, असा मुळीच अर्थ नाही. उद्योगांची वृद्धी आणि रोजगार निर्मितीच्या संधी तयार करण्यासाठी तुम्हाला जे हवे ते आयात करू शकता, असे त्यांनी धोरण स्पष्ट केले.