नवी दिल्ली – व्होडाफोन आयडियाने ग्राहकांकरता सुरू केलेल्या प्रिमियम सेवेचे ट्रायकडे समर्थन केले आहे. डाटा आणि कॉलिंग चार्जचे दर प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चापेक्षा कमी होत आहेत. तर दुसरीकडे तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे दुरसंचार कंपन्यांना दुहेरी फटका बसत आहे, असा व्होडाफोन आयडियाने दावा केला आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रिमियम प्लॅनबाबत व्होडाफोन आणि एअरटेलला विचारणा केली आहे. त्यावर दिलेल्या उत्तरात व्होडाफोन आयडियाने नवीन रिचार्जचा प्लॅन ही नवीन सेवा नाही, असे स्पष्ट केले आहे.
व्होडाफोन आयडियाने रेडएक्सप्लॅन सुरू केला आहे. यामध्ये ग्राहकांना वेगवान इंटनेट देण्यासाठी कंपनीकडून वचनबद्धता दाखविण्यात आली आहे. नेटवर्कची पुरेशी क्षमता आहे. त्यामुळे जरी अभूतपूर्व ट्रॅफिक वाढली तरी स्पेक्ट्रमचा पूर्ण क्षमतेने वापर करणे शक्य असल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे. रेडएक्स ग्राहकांचे एकूण 4 जीच्या ग्राहकांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाण आहे.
ट्रायकडून व्होडाफोन आयडियाच्या रेडएक्स आणि भारती एअरटेल प्लॅटिनियमच्या प्लॅनची चौकशी करण्यात येत आहे. ठराविक ग्राहकांना नेटवर्कमध्ये प्राधान्य दिल्याने इतर ग्राहकांच्या सेवेत अडथळा येवू शकतो, असा ट्रायने आक्षेप घेतला आहे. तसेच दूरसंचार क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही ट्रायने म्हटले आहे.
त्याबाबत दोन्ही कंपन्यांनी त्यांची भूमिका आणि दाव्यांबाबतची आकडेवारी देण्याचे ट्रायने आदेश दिले होते. एअरटेलने बाजू मांडताना थेट जिओवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. जिओच्या बंडल योजनेतून ओटीटी हॉटस्टार मोफत देण्यात येते. तसेच जिओफोनच्या ग्राहकांसाठीच काही योजना देण्यात येतात. एअरटेलकडून कोणती वेगळी योजना नसून नोव्हेंबर 2019 च्या योजनेचा भाग असल्याचे ट्रायला दिलेल्या उत्तरात कंपनीने म्हटले आहे.