बंगळुरू - आयटी उद्योगाची शिखर संस्था नॅसकॉम चीनमध्ये तिसरे आयटी कॉरिडॉर सुरू करणार आहे. हे आयटी कॉरिडॉर जिआंग्सू प्रांतामधील शुझहौ शहरात सुरू करण्यात येणार आहे.
नॅसकॉमने चीनमध्ये यापूर्वी पूर्व चीनमध्ये दालियान आणि गुयांगमध्ये आयटी कॉरिडॉर सुरू करण्यात आली आहेत. शुझहौ शहराच्या भागीदारीने भारतीय सॉफ्टवेअरची बाजारपेठ विकसित होण्यास मदत होणार आहे.
नॅसकॉमला नव्या भौगोलिक प्रदेशात आयटी कॉरिडॉर नवे विकसित करण्यासाठी ही भागीदारी उपयुक्त ठरणार आहे. शुझहौ हे हुआई हाई आर्थिक क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच चीनचे महत्त्वाचे वाहतुकीचे केंद्र आहे. या शहरातून शांघाय, हांगशुओ, नानजिंग आणि सुशुओ या महत्त्वाच्या शहरामध्ये तीन तासात स्पीड रेल्वेने जाता येते.
हा आयटी कॉरिडॉर चीनमधील उत्पादन, रिटेल, ऑटोमोटिव्ह, आरोग्य अशा क्षेत्राला लागणाऱ्या डिजीटल तंत्रज्ञान विकसित करण्याचा आमचा हेतू असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे. याबरोबर भागीदारीतून शुझहौ व भारतात अधिक रोजगार निर्मिती होईल, असे नॅसकॉमने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशामध्ये बौद्धिक देवाण-घेवाण करणे शक्य होणार आहे.
नॅसकॉमने ३०० चिनी कंपन्यांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर १० लहान आणि मध्यम अशा भारतीय कंपन्यांनाबरोबर ३१५ कोटी रुपयांचा करार केला आहे. दालियान आयटी कॉरिडॉरमध्ये ३२२ कोटींची तर गुयियांगमध्ये ६२३ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.