नवी दिल्ली - मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर भागात दुधाचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी वाढविले आहेत. दुधाचा होणारा कमी पुरवठा आणि उत्पादन खर्च या कारणांनी दरवाढ केल्याचे मदर डेअरीने म्हटले आहे. हे नवे दर रविवारपासून लागू होणार आहेत.
दूध पुरवठा करणाऱ्या विविध राज्यांत प्रतिकूल हवामानामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे दुग्धोत्पादनासाठी लागणाऱ्या पशुखाद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात दूध उत्पादकांना प्रति लिटर ६ रुपयांनी जादा दर देण्यात येत असल्याचे मदर डेअरीने म्हटले. हा दर गतवर्षीहून २० टक्के अधिक आहे. मदर डेअरीकडून राजधानीसह एनसीआरच्या बाजारपेठेत सुमारे ३० लाख लिटर दूध किरकोळ विक्री केंद्रांना पुरवण्यात येते.
हेही वाचा-अदानी ट्रान्समिशनला महाराष्ट्रात विद्युत प्रकल्प उभारण्याची परवानगी
असे आहेत दुधाचे नवे दर -
मदर डेअरीचे टोकन दूध हे प्रति लिटर २ रुपयांनी वाढून ४२ रुपये झाले. तर फूल क्रिमचे दूध २ रुपयांनी वाढून प्रती लिटर ५५ रुपये करण्यात आले आहे. तर अर्धा लिटर फूल क्रीमचे दूध २७ रुपयांवरून २८ रुपये झाले. टोन्ड दुधाची किंमत प्रती लिटर ३ रुपयांनी वाढवून ४५ रुपये करण्यात आली आहे. तर डबल टोन्ड दुधाची किंमत ३६ रुपयांवरून ३९ रुपये प्रती लिटर झाली. म्हशीचे दूधही प्रती लिटर ३ रुपयाने वाढून ४७ रुपये झाले.