नवी दिल्ली - वस्तू व सेवांच्या पुरवठादारांची विशेषत: एमएसएमईची बहुतांश रक्कम देण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. येत्या काही दिवसात राहिलेली थकित रक्कम देण्यात येईल, अशी त्यांनी माहिती दिली. त्या विविध अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होत्या.
निर्मला सीतारामन यांनी पायाभूत मंत्रालये, वित्तीय मंत्रालयातील व्यय (एक्सपींडियचर) विभागाचे सचिव जी. सी. मुर्मु यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. थकित असलेल्या ६० हजार कोटींपैकी ४० हजार कोटी देण्यात आल्याचे त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-सरकार अन् उद्योगपतींमध्ये अविश्वास वाढत आहे - उद्योगपती अजय पिरामल
येत्या चार तिमाहीदरम्यान करण्यात येणाऱ्या भांडवली खर्चाबाबतची सविस्तर माहिती सीतारामन यांनी मंत्रालयांकडून मागविली आहे. या भांडवली खर्चामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे. कायदेशीर वाद नसलेली रक्कमही येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. सरकारने रक्कम थकवू नये, असे सीतारामन यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-केंद्राचा दणका: भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १५ वरिष्ठ प्राप्तिकर अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती
जे लोक वाट पाहत आहेत, त्यांच्याकडे पैसे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले. बहुतांश पायाभूत मंत्रालयांनी भांडवली खर्चाचे चालू वर्षातील उद्दिष्ट ५० टक्के पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून एमएसएमईची रक्कम वेळेवर येत नसल्याने उद्योगाकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. कॉर्पोरेट करात कपात केल्याने वित्तीय तूट वाढेल का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सरकार वित्तीय तुटीचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-देशात ४ जी स्मार्टफोनचे ६० लाख वापरकर्ते वाढणार; सणानिमित्तच्या सेलचा परिणाम