नवी दिल्ली – केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने पंतप्रधान किसान संपदा योजनेसाठी (पीएमकेएसवाय) इच्छुक गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी निविदा मागविली आहे. सुरुवातीला ही योजना केवळ विशेष प्रवर्ग, भटक्या जमाती आणि उत्तरपूर्व राज्यांतील कंपन्यांसाठी खुली होती. ही योजना केंद्र सरकारने सर्वांसाठी खुली केली आहे.
पंतप्रधान किसान संपदा योजनेत अन्नप्रक्रिया उद्योग हे देशाच्या विविध क्लस्टरमध्ये सुरू करता येणार आहेत. त्यासाठी इच्छुक कंपन्यांना केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू असणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2020 आहे. प्रवर्तकांना 31 ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजेपर्यंत अर्ज करण्याची मंत्रालयाने सूचना केली आहे.
अशी आहे पंतप्रधान किसान संपदा योजना-
पंतप्रधान किसान संपदा योजनेत शेतापासून किरकोळ विक्री केंद्रापर्यंत आधुनिक पायाभूत पुरवठा साखळी तयार करण्याचे व्यवस्थापन आहे. त्यामुळे देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यामधून मोठी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे. या संपदा योजनेतून ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होवू शकणार आहेत. तसेच शेतमालाचे नुकसान कमी होवू शकणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामधून निर्यात वाढू शकेल, अशीही केंद्र सरकारला अपेक्षा आहे.