अबुधाबी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीत रुपे कार्ड लाँच केले. त्यासाठी मोदींनी इमिरेट्स पॅलेसमधून १ किलोचे मोतीचूरचे लाडू खरेदी केले. मध्य-पूर्वेत रुपे कार्ड लाँच झालेले अबुधाबी हे पहिले शहर ठरले आहे.
संयुक्त अरब अमिरातीमधील प्रमुख १२ आउटलेट्समध्ये पुढील आठवड्यापासून रुपे कार्ड स्वीकारण्यात येणार असल्याचे भारतीय राजदूत नवदीप सिंग पुरी यांनी सांगितले. मोदींनी दुकानामधून १ किलो मोतीचूरचे लाडू रुपे कार्डच्या मदतीने खरेदी केल्याचे छप्पन भोग दुकानाचे मालक विनय वर्मा यांनी म्हटले. या महत्त्वाकांक्षी लाँचचा भाग झाल्याने आनंद व आमच्यासाठी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यापासून युएई इमिरेट्स एनबीडी, बँक ऑफ बडोदा आणि एफएबीमधून रुपे कार्ड दिले जाणार आहे.
उद्योग समुदायाने रुपे कार्डच्या लाँचचे स्वागत केले आहे. या उपक्रमामधून संयुक्त अरब अमिराती व भारतामधील उद्योग समुदाय एकत्र येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) मर्क्युरी पेमेंट सर्व्हिसेसबरोबर करार केला आहे. या करारामुळे रुपे कार्ड संयुक्त अरब अमिरातीमधील १ लाख ७५ हजार विक्रेत्यांकडे स्वीकारण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीमधील ५ हजार एटीएमवरही त्याचा वापर करणे शक्य होणार आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भुतानमध्येही रुपे कार्ड लाँच केले होते.